हा नवा इतिहास आहे – स्वातंत्र्ययोद्ध्यांचे पाठीराखे झालेले महाराजा सयाजीराव गायकवाड या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा! या एकट्या राजाने हिंदुस्थानच्या राष्ट्रीय चळवळीस हिमतीने मदत केली, क्रांतिकारकांना पाठबळ दिले आणि आयुष्यभर ब्रिटिश सत्तेशी आपल्या नागरी हक्कांसाठी संघर्षही केला.
ही गोष्ट स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत अभ्यासकांनी, इतिहासकारांनी आणि संशोधकांनी सांगितली नाही.
लोककल्याणाचा ध्यास घेतलेल्या या द्रष्ट्या राजाने शिक्षण, प्रशासन, सामाजिक न्याय या सुधारणांसोबत साहित्य, कला व संस्कृतीस मदत केली.
शेती, उद्योग, सहकारात लक्षणीय कार्य केले, याबद्दलही इतिहासविमर्शकांकडून काही सांगितले गेले नाही.
पितामह दादाभाई नौरोजी, ना. गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, लजपतराय, महात्मा गांधी, मादाम कामा, सावरकर या स्वातंत्र्ययोद्ध्यांना सयाजीरावांनी मदत केली. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू, न्या. रानडे, पं. मालवीय, कर्मवीर भाऊराव आणि अनेक युगपुरुषांना मदत केली.
अरविंद घोष, खासेराव जाधव, केशवराव देशपांडे या सयाजीरावांच्या अधिकार्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी केलेली मदत ब्रिटिश सरकारला आवडत नव्हती.
यामुळे हिंदुस्थान सी.आय.डी.प्रमुखाने सयाजीरावांमागे गुप्तहेर लावले.
हा गोपनीय अहवाल गव्हर्नर जनरलकडून लंडनला पाठविला गेला.
गायकवाडांकडून ब्रिटिश साम्राज्याला गंभीर धोका आहे, असा ‘व्हेरी सीक्रेट ए बँडेड बॉक्स केस’ ही फाइल लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीत साठ वर्षे बंद होती.
बंद फायलीतील हा नवा इतिहास ‘स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे सयाजीराव गायकवाड’ या पुस्तकाद्वारे मूळ कागदपत्रांसह येत आहे.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यातील हे सोनेरी पान आहे.
आतापर्यंत सर्वांनी दुर्लक्षित केलेला हा इतिहास या पुस्तकातून पुढे आला आहे.
महाराजा सयाजीराव यांच्या चरित्राचे व कर्तृत्वाचे विविध पैलू बाबा भांड यांनी चरित्र, कादंबरी, किशोर कादंबरी अशा विविध माध्यमांतून यापूर्वी विशद केले आहेत. प्रस्तुत पुस्तक हे या बृहत प्रकल्पाचाच एक भाग आहे.
Reviews
There are no reviews yet.