हिंदुस्थानच्या इतिहासाकडे एक कटाक्ष टाकला असता ‘तत्त्वज्ञ’ आणि ‘तत्त्वज्ञ सत्ताधीश’ या दोहोंचा मिलाफ असणारे फारच थोडे सत्ताधीश पाहावयास मिळतात. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि बडोद्याचे महाराजा सयाजीराव यांचा अग्रक्रम आहे.
शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानच्या प्रजेत स्वराज्याविषयी जागृती करून क्रांतीचे बीजारोपण केले. त्याचप्रमाणे आधुनिक काळात सयाजीराव महाराजांनी प्रजेत स्वदेश, स्वभाषा आणि स्वाभिमान यांचे स्फुलिंग निर्माण केले. यासाठी त्यांनी मानवी जीवनात सुधारणा होणाऱ्या सर्व क्षेत्रांचा अभ्यास केला. त्याचा सुधारणेसाठी उपयोग केला.
प्रजेचे जीवनमान सुधारण्यासाठी अभ्यासांती ‘शिक्षण’ ही संकल्पना सर्वप्रथम त्यांच्यासमोर आली. त्यानुसार शिक्षण क्षेत्रात अनेक प्रयोग केले. ‘मागासवर्गीयांसाठी वसतिगृहे ते सक्तीचे मोफत शिक्षण’ हा पहिला प्रयोग त्यांनी राज्यभर सुरू केला.
सयाजीराव महाराजांनी संपूर्ण सत्ताकाळात विविध ज्ञानशाखांचा अभ्यास, होतकरू आणि परिश्रमींना संधी, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, धर्मांचा तुलनात्मक अभ्यास, स्त्री-पुरुष समानता, देश- परदेश प्रवास व शिक्षण संस्थांना भेटी, जागतिक विचारवंतांशी स्नेह आदी कामे प्लेटोला अपेक्षित असलेल्या तत्त्वज्ञ सत्ताधीशांप्रमाणे केली.
Reviews
There are no reviews yet.