पुरुषांपेक्षा स्त्रिया कमी दर्जाच्या, त्यामुळे त्यांना शिक्षणाची गरज नाही, असे ज्या काळात मानले जात होते त्या एकशे तीस वर्षांपूर्वी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी स्त्रीशिक्षणाचा हुकूम काढून या ऐतिहासिक कार्याची 1885ला सुरुवात केली. या क्रांतिकारी सुधारणांचा वास्तवदर्शी वृत्तांत करणार्या सौ.
मंदा हिंगुराव यांचा ‘महाराजा सयाजीराव आणि स्त्रीशिक्षण’ हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. हिंदुस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण देणारे पहिले महाराजा सयाजीरावच आहेत; पण या अगोदर स्त्रीशिक्षणासाठी झटणारा पहिला दूरदृष्टी राजा ही त्यांची ओळख या पुस्तकातून होत जाते. स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मुलींच्या सार्वत्रिक शिक्षणाचे महत्त्व त्यांनी ओळखले. त्यासाठी स्त्रीशिक्षणाचे धोरण ठरवून त्यांची कशी अंमलबजावणी केली, हे या ग्रंथात संदर्भासह बघायला मिळते.
स्त्रिया शिकल्या तर सामाजिक जीवनात सकारात्मक बदल होतील, घराघरात मुले शिकू लागतील. स्त्री स्वातंत्र्यासाठी शिक्षणाची, विचारांची आणि उद्योगप्रियतेची गरज आहे, त्याकरिता त्यांना प्रथम शिकविले पाहिजे या भूमिकेतून महाराजांनी स्त्रीशिक्षणाचे कार्य केले. समाजाच्या आनुवंशिक शक्तीची गुणवत्ता वाढेल. गृहसौख्यासोबत स्त्रिया जगाच्या व मानवजातीच्या कल्याणाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. हे ओळखून स्त्रियांना शिकवून महाराजांनी त्यांना मतदानाचा अधिकार दिला. लोकल बोर्ड, नगरपालिकात, प्रशासनात कायदेशीर सदस्यत्व दिले. हिंदुस्थानात स्त्रियांना मतदानाचा हक्क प्रदान करणारे सयाजीराव महाराज पहिले आहेत. भारतातील शिक्षणशास्त्राच्या इतिहासातील महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या या कार्याचे पुनर्वाचन या ग्रंथाने होत आहे.
Reviews
There are no reviews yet.